जळगाव (क्राईम टुडे न्यूज ) – चाळीसगाव तालुक्यातील टाकळी गावाच्या पुलाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार १७ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी १८ जून रोजी दुपारी १२ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान एकनाथ निकम वय २८ रा. देवळी ता. चाळीसगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भागवत निकम हे आपल्या परिवारासह चाळीसगाव तालुक्यातील देवळी गावात वास्तव्याला होते. सोमवारी १७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास भागवत निकम हे आपल्या पत्नी करिष्मा भागवत निकम यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ झेड ३०४४) ने मालेगाव ते चाळीसगाव रोडने येत असतांना टाकळी गावाच्या पुलाजवळ समोरून येणारी दुचाकी क्रमांक एमएच २० सीए २२०४ ने जोरदार धडक दिली. या अपघातात भागवत निकम यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी करिष्मा निकम या गंभीर जखमी झाले. त्यांना चाळीसगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मंगळवारी १८ जून रोजी दुपारी १२ वाजता मेहुणबारे पोलीसात दुचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे हे करीत आहे.