जळगाव । संध्याकाळी कामावरून घरी परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने सोमवारी १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता गिरणा नदी पात्रात बुडालेल्या मंगल इघन बाविस्कर (वय- ३२, रा. बोरनार, ता. जळगाव) या तरुणाचा बुधवार, २० डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता मृतदेह सापडला. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगल बाविस्कर हा तरुण जळगाव तालुक्यातील बोरनार येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरी काम करून आपला प्रपंच भागवत होता. सोमवारी १८ डिसेंबर रोजी सकाळी तो कामावर गेला होता. सध्या गिरणा नदीचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे गिरणा नदीला चांगलेच पाणी आलेले आहे. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास मंगल घरी परतत असताना त्याला नदीपात्रात पाण्याचा अंदाज आला नाही व तो पाण्यात बुडाला. ही घटना लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. तसेच काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही बोलविले. अखेर बुधवारी २० डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता त्याचा मृतदेह सापडला. तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे