तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांच्या घरकुल प्रकरण व विहिरीच्या फाईलवर सही करण्याच्या मोबदल्यात महिला सरंपचासह एकाला १३ हजारांची लाच घेतांना वाशीम लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
वाशीम (क्राईम टूडे न्यूज) । तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांच्या घरकुल प्रकरण व विहिरीच्या फाईलवर सही करण्याच्या मोबदल्यात महिला सरंपचासह एकाला १३ हजारांची लाच घेतांना वाशीम लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील माहुली गावातील महिला सरपंचासह एका इसमाला १३ हजाराची लाच घेताना वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या टीमने रंगेहात पकडले आहे. माहुली सरपंच गोकर्णाबाई विष्णू राठोड (वय-५०) आणि विष्णू मंगु राठोड (वय-५५) रा. माहुली, ता मानोरा, जि. वाशिम असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.
दोघांनी ३० वर्षीय तक्रारदार एक घरकूल आणि त्यांचे नातेवाईक यांचे एक घरकुल असे २ घरकुलच्या फाईलवर सही करण्याकरिता ४ हजार रूपये तसेच तक्रारदार यांचे नातेवाईक यांचे दोन विहिरीच्या फाईलवर सही करण्याकरिता १० हजारांची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी सापळा रचला त्यानुसार पडताळणी करत असतांना दोघांनी १४ हजारांची लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती १३ हजार रूपये स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार विष्णू मंगू राठोड याने १३ हजार रूपये स्विकारतांना वाशीम लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.