जळगाव (क्राईम टूडे प्रतिनिधी) । जळगाव शहरातील सुरभी लॉन समोरील एका बंदावस्थेत असलेल्या कंपनीच्या आवारात एका ६६ वर्षीय वृध्दाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या आवस्थेत गुरूवारी सकाळी आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून पंचनामा करण्यात येवून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला आहे. ईश्वर देवराम अहिरे रा. राम नगर, जळगाव असे मयत वृध्दाचे नाव आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव एमआयडीसी हद्दीतील सुरभी लॉनच्या समोर बंदावस्थेत पडलेल्या विक्रम प्लास्टीक कंपनीच्या आवारात गुरूवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ईश्वर अहिरे यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह येथील सुरक्षा रक्षक काशिनाथ मराठे याच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलीसांना कळविले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. याप्रसंगी फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ही आत्महत्या की घातपात असल्याबाबत चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. शुभम लालसिंग ठाकूर वय-३० यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.