यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील भालोद येथील महाविद्यालयात हिंगोणा येथील तरुणासोबत झालेल्या वादात सोडवा सोडव केल्याचा राग म्हणून रावेर तालुक्यातील सावदा, कोचूर, न्हावी, फैजपूर, चिनावल येथील काही ग्रामस्थांनी भालोद येथील एका वस्तीवर लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड, फायटर व सोबतच दगडफेक करत हल्ला केला. यात दोन तरूण गंभीर जखमीझाले आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, २७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील भालोद येथील एका वस्तीवर ललित सुनील वाणी, भूषण नेमाडे, चेतन सोनवणे, प्रशांत सोनवणे, हेमंत दिलीप पाटील (सर्व राहणार न्हावी. ता. यावल), भास्कर चौधरी, गणेश उर्फ देवा देवकर रा. सावदा ता. रावेर, कल्पेश पाटील, सुनील संतोष चिमणकर, पवन सुतार सर्व रा. कोचुर ता.रावेर, भूषण जाधव, नीरज झोपे, रितेश चौधरी, शिवम बाविस्कर रा. सावदा, इंद्रजीत पाटील, मयूर भारंबे, शुभम भारंबे सर्व रा. फैजपूर ता. यावल व त्यांच्यासोबत जवळपास ३० ते ४० जणांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात आशुतोष अशोक भालेराव (वय-२१) आणि रोहित उर्फ बुबा मधुकर लोखंडे (वय-२०) दोघे रा. भालोद हे गंभीर जखमी झाले. यापैकी रोहित लोखंडे याची प्रकृती चिंताजनक असून ते जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल आहेत.
यावरून झाला वाद
भरत चौधरी आणि शुभम कराड यांच्यामध्ये झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या रोहित लोखंडे याचा राग मनात आल्याने वरील जातीयवादी मानसिकतेच्या मुलांनी भालोद येथील बौद्ध वस्तीवर दगडफेक करून लाट्या-काठ्यांनी लोखंडी रॉडने मारहाण करून अनेकांना जखमी केले. यात रोहित लोखंडे याला डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसचे जातीवाचक शिवीगाळ करून यांना धडा शिकवावा लागेल” अशी शिवीगाळ करून फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी लाट्या काठ्यांनी मारहाण केली. तर काहींनी आवराआवर करण्यासाठी आलेल्या तीन महिलांशी अश्लिल वर्तन करून त्याचा विनयभंग देखील केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करीत आहे.