जळगाव-(क्राईम टुडे न्यूज) । जळगाव तालुक्यातील शिरसोली ते वावडदा दरम्यान एक अवजड कंटेनर रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे रस्त्याच्या खाली उतरून अपघात झाल्याची घटना गुरूवार २० जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. यात कंटेनरचा अर्धा भाग रस्त्याच्या खाली व अर्धा रस्त्यावर असल्यामुळे महामार्गावर वाहतूकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान रात्री एक वाजेपर्यंत क्रेन येईपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे करीत होते.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सदरहू कंटेनर क्रमांक (एमएच १९ झेड ४२०७) हे जळगाववरून मुंबईकडे निघाले होते. सर्व कंटेनरमध्ये माल भरलेला होता. शिरसोली ते वावडदा दरम्यान हॉटेल फौजी जवळ चालकाला रस्त्यावरचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते रस्त्याच्या खाली उतरले. मात्र त्याचे पुढील चाक रस्त्याच्या खाली तर मागील भाग हा महामार्गावरच अडकून पडला. त्यामुळे इतर वाहनांना जाण्या येण्याचा मार्ग बंद पडल्याने जवळजवळ रस्ता बंदच झाला.
घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही अथवा जीवित हानी झालेली नाही. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरहू कंटेनर हा हटवता येत नव्हता. त्यामुळे दोन क्रेनची मदत घेण्यात येणार आहे. रात्री एक वाजेपर्यंत क्रेन येण्याची पोलीस वाट पाहत होते. दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रयत्न करत होते. घटनास्थळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ देखील जमा झाले होते.