क्राईम टुडे न्यूज – रूग्णवाहिका आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरूण डॉक्टराचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघात गुरूवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातारा लातूर महामार्गावर घडला आहे. वसंत भोसले (वय ३५, रा. अकलूज, ता. माळशिरस) असे मरण पावलेल्या डॉक्टरांचे नाव आहे.
पोलिस सूत्रांकडील माहितीनुसार, अपघातातील रुग्णवाहिका (एमएच ११ सीएच ९३२४) ही म्हसवड येथून एका रुग्ण बालकाला घेऊन अकलूजच्या दिशेने निघाली होती. गारवाडपाटी जवळ येताच मांडकीहून अकलूजकडे निघालेली कार (एमएच १० बीए ४३४५) यांच्यात जोरात धडक झाली. या धडकेत कारचालक डॉ. वसंत भोसले (रा. अकलूज) हे गंभीर जखमी झाले. त्यांना अकलूज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मांडकी आरोग्य केंद्रावर शोककळा डॉ. वसंत भोसले हे मांडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. मांडकी आरोग्य केंद्रावर शोककळा पसरली आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून याबाबत माळशिरस पोलिसात खबर देण्यात आली आहे.