चुलत काकांचे वर्षश्राध्द कार्यक्रमाला दुचाकीने जात असलेल्या पती-पत्नीवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे (क्राईम टूडे न्यूज)- चुलत काकांचे वर्षश्राध्द कार्यक्रमाला दुचाकीने जात असलेल्या पती-पत्नीवर बिबट्याने (Leopard attacks wife on wife) हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात पती जखमी झाले असून पत्नी थोडक्यात बचावली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील पेठ ते चांडोली रस्त्यावर घडली आहे.
भरत गोविंद राऊत ( वय ५३) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर मंचर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार बुधवार १५ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भरत गोविंद राऊत आणि त्यांची पत्नी रचना भरत राऊत व मुलगा समर्थ भरत राऊत हे भाऊबीजेचा कार्यक्रम उरकून रात्री ९ वाजता पेठ येथुन चांडोली येथे चुलत भाऊ राहुल रेवजी राऊत यांच्या घरी चुलत्याच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाला निघाले होते. रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान ते चांडोली फाटा येथे आले असताना रस्त्याच्या बाजूकडे उसाच्या शेतातून अचानक बिबट्याने डरकाळी फोडत त्यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी या हल्यात बिबट्याने भरत राऊत यांच्या पायावर पंजा मारल्याने ते जखमी झाले आहेत. मात्र प्रसंगावधान दाखवत त्यांनी दुचाकी पळवली. मात्र तरीही बिबट्या त्यांचा पाठलाग करत होता. मात्र मागे बसलेल्या भरत यांच्या पत्नीने त्या पाठलाग करणाऱ्या बिबट्याच्या अंगावर पर्स फेकून मारली तेव्हा बिबट्या थोडा दबकला. तरी देखील बिबट्या काही अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग करत होता. मात्र नंतर त्यांच्या मागून एका मोठी गाडी आल्याने बिबट्या त्या गाडीच्या प्रकाशाने निघून गेला.
त्यानंतर भरत यांनी याबाबत त्यांचा भाऊ राहुल राऊत याला फोन करून घटनेची माहिती दिली. त्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेत भरत यांना मंचर येथील रुग्णालयात दाखल केले. घडलेल्या घटनेबाबत वन विभागाला कळवण्यात आले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.