जळगाव (क्राईम टूडे न्यूज) – चौकशी समितीत अनुकुल असा रिपोर्ट देण्याच्या मोबदल्यात ५ लाखांची मागणी करत रक्कम स्विकारतांना जळगाव लाचलुचपत विभागाने सहाय्यक गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांना रंगेहात पकडल्याची घटना मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता केली होती. दोघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील दोघांना न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार हे लोकसेवक कर्मचारी असून त्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर असलेल्या चौकशी समितीवर सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालीग्राम सपकाळे (वय-५४) आणि विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे (वय-५३) हे दोघे प्रमुख आहेत. दरम्यान लोकसेवक यांना दोष मुक्त करण्यासाठी अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी ५ लाख रूपये लागतील असे सहाय्यक गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी सांगितले. परंतू तक्रारदार लोकसेवक यांना पैसे देण्याचे नसल्याने त्यांनी जळगाव लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता सापळा रचला होता. त्यानुसार दोघांना पाच लाखांची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. दोघांविरोधा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी अटकेतील दोन्ही संशयितांना जळगाव जिल्हा न्यायालयातील श्री वावरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे ॲड.रमाकांत सोनवणे हे काम पाहत आहे.