व्यापारी सकाळी दुकानावर आला.. दुकानाचे शटर उघडता उघडताच अनर्थ घडला

गुन्हे ठळक बातम्या धरणगाव

अवघ्या काही सेंकदात पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी गायब

जळगाव (प्रतिनिधी ) – धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एका व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. व्यापारी हा दुकान उघडत होता, एका दुकानाचे शटर उघडले, दुसरे शटर उघडत असतांना ही घटना घडली. अवघ्या क्षणातच पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी चोरटयांनी गायब केल्याची माहिती मिळाली आहे. सकाळच्या वेळी भरदिवसाच्या या घटनेने धरणगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात गौरव डेडीया यांचे अनिल कुमार अँड हेमराज कंपनी नावाने किराणा दुकान आहे. ते होलसेलचे व्यापारी आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गुंजन डेडिया हे नेहमीप्रमाणे त्यांचे दुकान उघडण्यासाठी आले होते. गुंजन डेडीया यांनी दुकानाचे एका बाजूचे शटर उघडून हातातील पावणे सात लाखांची रोकड असलेली पैशांची पिशवी त्या शटर उघडलेल्या दुकानात ठेवली आणि पुन्हा डेडीया हे त्याच दुकानाचे समोरील शटर उघडण्यासाठी गेले . याच दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोघा भामट्यांनी संधी साधली आणि दुकानात घुसून पावणे सात लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी घेऊन दुचाकीवर पोबारा केला. दरम्यान चोरटे हे दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

भामट्यांनी सकाळी साडेआठ वाजेपासूनच डेडीया यांच्यावर पाळत ठेवली असावी, तसेच व्यापारी गौरव डेडीया यांच्या परिचितांमधील कुणीतरी या भामट्यांना डेडीया यांच्याकडे रोकड असल्याची टीप दिली असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक चोरट्यांच्या तपासात वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी दिली. धरणगाव सारख्या छोट्याशा शहरात भर दिवसा एवढी मोठी चोरी झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

#dharngaonnews#jalgaonnews#crimenews#baglifting#jalgaoncrime

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *