जळगाव शहर पोलीसांची कारवाई : फुले मार्केटमधील व्यापाऱ्याला दिली होती धमकी
जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील फुले मार्केटमध्ये गुरुवारी रात्री काही युवकांनी व्यापाऱ्यांना धमकावत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकारानंतर, या प्रकरणातील दोन संशयित तरुणांना पोलिसांनी अटक करुन त्यांची शुक्रवारी ज्या मार्केटमधील व्यापाऱ्यांना धमकाविले, त्याच मार्केटमधून धिंड काढल्याची घटना घडली. मनिष अरुण इंगळे (वय-१८) व गणेश उर्फ डेब्या सोनवणे (वय-२०) या असे धिंड काढणाऱ्या संशयित तरुणांची नावे आहेत. शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत असून यामुळे तरुणांची व्यापाऱ्यांमध्ये असलेली दहशत नक्कीच कमी होईल, असे बोलले जात आहे.
जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी काही अतिक्रमणधारकांनी व्यापाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकारानंतर मार्केटमधील व्यापाऱ्यांनी जळगाव महापालिकेवर मोर्चा काढला होता तर दुसरीकडे फुले मार्केट सुध्दा बंद केले होते. सायंकाळी दुकाने उघडल्यानंतर मनिष अरुण इंगळे व गणेश उर्फ डेब्या सोनवणे या युवकांनी एका व्यापाऱ्याला धमकावत, त्या व्यापाऱ्याला धक्काबुक्की केली होती. त्यानंतर पोलीसांनी सरकारपक्षातर्फे स्वत: फिर्यादी होवून दोन्ही संशयित तरुणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी दुपारी या दोन्ही संशयित तरुणांना शहर पोलिसांनी अटक केली, तसेच व्यापाऱ्यांमधील भिती तसेच त्यांची दहशत कमी व्हावी म्हणून दोघांना अटक केल्यानंतर, फुले मार्केटमधून त्यांची धिंड काढण्यात आली.
*….त्यामुळे पोलिसांनी काढली धिंङ.*
गुरुवारी सकाळी व रात्री देखील व्यापाऱ्यांना धमकाविणे, धक्काबुक्की करण्याचे प्रकार फुले मार्केटमध्ये घडले आहेत. मात्र सकाळी घडलेल्या प्रकारानंतर व्यापारी चांगलेच संतापले होते. मात्र, दोन्ही प्रकरणात व्यापाऱ्यांकडून कोणतीही तक्रार पोलीसांकडे देण्यात आली नाही. दरम्यान संशयित तरुणांच्या टवाळखोरीसह भितीमुळे तक्रार देण्यास व्यापारी पुढे आले नसल्याचेही बोलले जात आहे. आणि कदाचित हीच व्यापाऱ्यांमध्ये असलेली भिती नष्ट व्हावी, यासाठी शहर पोलिसांनी त्यांची त्याच मार्केटमधून धिंड काढल्याची चर्चा आहे.
#jalgaonnews#crimenews#phulemarketjalgaon