जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील सराईत गुन्हेगार मुकेश प्रकाश भालेराव वय २८ रा. भुसावळ याच्यावर सोमवार, २३ जानेवारी रोजी जिल्हाप्रशासनाच्या वतीने एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे. मुकेश भालेराव यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेवून स्थानबध्द करण्यात आले असून नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मुकेश भालेराव याच्याविरोधात भुसावळ शहर व तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ४ गुन्हे, दंगलीचा एक गुन्हा, आत्महत्येचा प्रयत्न करणे, भारतीय हत्यार कायदा अशा एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. वेळोवेळी अटक केल्यानंतरही मुकेश हा जामीनावर बाहेर आल्यानंतर गुन्हे करत होता, त्यास कायद्याचा कुठलाही धाक राहिलेला होता, त्यानुसार त्याच्यावर एमपीडीएची कारवाई करण्यात येवून त्याला स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक गजानन पडघन यांनी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे सादर केला होता. पोलीस अधीक्षकांना प्रस्तावाची पडताळणी करुन हा प्रस्ताव कारवाईसाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी मुकेश भालेराव याच्यावर एमपीडीएची कारवाई करत त्याच्या स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले . या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक आसिफ खान युसूफ खान, मोहम्मद अली, अनिल चौधरी, संजय पाटील सुपडू पाटील, विकास बाविस्कर, भूषण चौधरी यांच्या पथकाने मुकेश भालेराव यास ताब्यात घेवून त्याची नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करत स्थानबध्द केले.
#jalgaonnews#crimenews #jalgaonpolice