शिंदे गटाच्या माजी नगरसेवक पुत्राने केला हवेत गोळीबार

गुन्हे ठळक बातम्या नाशिक

अध्यक्षपदावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद 

नाशिक (क्राईम टूडे टीम) – देवळाली गाव परिसरात शिवजयंतीच्या आयोजनावरून बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या चर्चेत ठाकरे आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला. या वादातून  शिंदे गटाचे पदाधिकारी  असलेले माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचा  मुलगा स्वप्नील लवटे याने बंदूक काढत हवेत गोळीबार केल्याची घटना काल रात्री नाशिक मध्ये घडली होती.  दरम्यान या प्रकरणी  पोलिसांनी संशयित स्वप्नीलला ताब्यात घेतले असून उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

देवळाली येथील गांधी चौक परिसरात गुरुवारी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.  दरम्यान अध्यक्ष पदाच्या निवडीवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता.या वेळी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा मुलगा आणि शिंदे गटाचे नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजू लवटेंचा  यांचा पुतण्या स्वप्नील लवटे याने राग आल्याने कमरेला लावलेली बंदूक काढून हवेत गोळीबार केला आहे. यावेळी  परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

दरम्यान, उपनगर पोलीस ठाण्यात प्रत्यक्षदर्शी आणि तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून स्वप्नील लवटे याला पोलीसांनी अटक केली आहे.तर या प्रकरणाचा अधिकचा तपास केला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली आहे. गोळीबार झाल्यानंतर या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलीस आणि दंगल नियंत्रण  पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *