३ गावठी कट्टे ६ जीवंत काडतूस केले जप्त ; महाविद्यालयीन तरूण ताब्यात
धुळे (क्राईम टूडे टीम) । कारमधून गावठी कट्टे घेवून जाणाऱ्या तरूणांवर शिरपूर तालुका पोलीसांनी कारवाई केली आहे. या तरूणांकडून कारसह ३ गावठी कट्टे ६ जीवंत काडतूस असा एकुण पावणे ८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्या तरूणांवर कारवाई झाली आहे तरूण महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. जळगावच्या वेशिजवळ असलेल्या भोईटे गावाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
जळगाव सिमेवरील सत्रासेन गावाकडून भोईटे मार्ग शिरपूरकडे काही जण आलिशान गाडीमधून गावठी कट्यांसह शिरपूरच्या दिशेने जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरेश शिरसाठ यांनी त्यांच्या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ संशयीतांच्या शोधासाठी रवाना केले. त्यानुसार एपीआय शिरसाठ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भोईटी गावाजवळ सापळा रचला. ज्या कारची (एमएच १५ सीटी ५६८८) माहिती मिळाली होती ती कार आल्यानंतर पोलीसांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलीसांना पाहताच कार चालकाने वाहन जोराने पळविले.
या तरूणांना पोलीसांनी घेतले ताब्यात
पोलीसांच्या पथकाने सीनेस्टाईल कारचा पाठलाग करत भोईटे गावाच्या शिवारातच वाहन अडवले. वाहनाची तपासणी केली असता पोलीसांना कारमधून ३ गावठी कट्टे व ४ मॅक्झिन, ६ जिवंत काडतुस यासह ७ मोबाईल असा एकूण ७ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरपूर तालुका पोलीसांनी पकडलेल्या या कॉलेज तरूणांमध्ये मोहीतराम तेजवानी (वय 21, रा. पलंटनं. 10 विंग गोदावरी कॉम्प्लेक्स चिंचबनरोड पंचवटी, नाशिक), आकाश विलास जाधव, (वय 24 रा. रूम नं. 15 देह मंदिर सोसायटी विसे चोक, गंगापुर रोड नाशिक), राज प्रल्हाद मंदोरिया (वय 21 रा. प्लॉट नं. 6 आजाड निवास मधुबन कॉलनी पंचवटी नाशिक), अजय जेठा बोरीस (वय 29 रा. रूम नं. 6 चैतन्य हौसिंग सोसायटी रामवाडी पंचवटी, नाशिक), निवास सुरेंद्र कानडे, (रा. 24 (ब) दिव्य दर्शन सोसायटी, विसे मळा कॉलेज रोड नाशिक) व दर्शन चमनलाल सिधी (वय 21 रा. अजंदे बुद्रुक ता. शिरपुर) अशी या तरुणाची नावे आहेत. नेमकी ही शस्त्र कशासाठी व कुठे जात होती याचा पोलीस तपास करत आहे. या कारवाईने शिरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.