जळगाव- पश्चिम बंगाल मधून अल्पवयीन मुलीला जळगावात पळवून आणणाऱ्या संशयीताला स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील एमआयडीसीतील एका हॉटेल परिसरातून अटक केली आहे. चंदन कुचील चटोपाध्याय, रा. सहारजोरा, बंकुरा, मुक्ततोर, वेस्ट बंगाल असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. पिडीत अल्पवयीन मुलीस जळगाव बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पश्निम बंगालमधून एका अल्पवयीन मुलीला चंदन चटोपाध्याय याने पळवून नेल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील कुलताली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. चंदन हा अल्पवयीन मुलीसह जळगाव शहरात असून पिडीत मुलीचा शोध घ्यावा, असे पत्र दिल्ली येथील एका संस्थेने जळगाव पोलीस अधीक्षकांना पाठविले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना केल्या होत्या. चंदन हा जळगाव शहरातील एमआयडीसीतील हॉटेल सुमेरसिंगजवळ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, जितेंद्र पाटील, महेश महाजन, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, अविनाश देवरे, दिपक शिंदे, प्रवीण मांडोळे, सचिन महाजन, उमेश गोसावी, महिला अंमलदार अभिलाषा मनोरे, वैशाली सोनवणे यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी संशयित चंदन चटोपध्याय याला एमआयडीसीतील एका हॉटेल परिसरातून ताब्यात घेतले, त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत, बालकल्याण समिती येथे हजर करण्यात आले. समितीच्या ताब्यात देण्यात आले. संशयित चंदन यास न्यायालयात हजर करण्यात येवून पुढील कारवाईसाठी त्यास पश्चिम बंगालमधील कुलताली पोलीस ठाणे येथे नेण्यात आले आहे.