शेतात अज्ञात दरोडेखोरांनी जबरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये रखवाली करणाऱ्या ५२ वर्षीय रखवालदाराचा डोक्यात लोखंडी वस्तू टाकून निर्घूण खून केल्याचे बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे.
जळगाव (क्राईम टुडे न्यूज) – तालुक्यातील वावडदा ते म्हसावद दरम्यान वावडदा शिवारात शेतात अज्ञात दरोडेखोरांनी जबरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये रखवाली करणाऱ्या ५२ वर्षीय रखवालदाराचा डोक्यात लोखंडी वस्तू टाकून निर्घूण खून केल्याचे बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. तसेच, ट्रॅक्टर व रोटर हिटर चोरून नेले आहे. याबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास करीत आहेत. पांडुरंग पंडित पाटील (वय ५२, रा. बिलवाडी) असे मयत झालेल्या रखवालदाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथीलच रहिवासी ईश्वर मन्साराम पाटील यांचे वावडदा ते म्हसावद दरम्यान असणाऱ्या शेतामध्ये पांडूरंग पंडीत पाटील हे रखवालदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी ते शेतामध्ये रखवालदारी करण्यासाठी रात्री गेले होते. मध्यरात्री कधीतरी शेतामध्ये दरोडेखोरांनी प्रवेश केला. तेथे त्यांनी रोटर हिटर व ट्रॅक्टर चोरून नेले तर दरोडेखोरांनी लोखंडी अवजड वस्तूने पांडूरंग पाटील यांच्या डोक्यात जोरदार प्रहार करून निर्घृण खून केला. रोटर हीटर व ट्रॅक्टर घेऊन ते पसार झाले. दरम्यान सकाळी शेतमालक ईश्वर पाटील यांचा मुलगा राजेंद्र ईश्वर पाटील हा पहाटे ६ वाजता म्हशीचे दूध काढण्यासाठी आला असताना ही घटना उघडकीस आली. त्याने गावातील पोलीस पाटील सुवर्णा उंबरे आणि पोलिसांना याबाबत माहिती सांगितली.
यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्यांच्या विशेष तपासणी सुरू केली आहे. दरम्यान शेतातून चोरून नेलेले ट्रॅक्टर हे एरंडोल तालुक्यातील खडके फाटा येथे आढळून आलेले आहे. मयत पांडुरंग पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.