जळगाव-क्राईम टुडे न्युज । शहरातील जोशीपेठ येथील बागवान मोहल्यात घरगुती गॅसचा काळाबाजार करून चोरटी विक्री करीत असताना शनिपेठ पोलिसांनी एकावर शुक्रवार १ सप्टेंबर रोजी दुपारी कारवाई केली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून २० हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य हस्तगत केले.
शनिपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोशीपेठ मधील बागवान मोहल्यात अबरार अश्फाक बागवान (वय-२३, रा. तांबापुरा, जळगाव) हा तरुण घरगुती गॅसचा गैरवापर करून त्याची चोरटी विक्री करत असल्याची गोपनीय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शुक्रवार १ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी पथकाने कारवाई करत संशयित आरोपी अबरार अशपाक बागवान (वय-२३, रा. तांबापुरा जळगाव) यांच्याकडून गॅस सिलेंडर गॅस भरण्याचे साहित्य इलेक्ट्रिक पंप आदी साहित्य असा एकूण २० हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संदर्भात पोलीस हेडकॉन्स्टेबल गिरीश दिलीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अबरार अशपाक बागवान याच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गून्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे करीत आहे.