युट्युबवर पाहिले व्हिडीओ अन् बनविल्या १००, २०० अन् ५०० रुपयांच्या हुबेहुब नोटा…
जळगाव (प्रतिनिधी) – झपटप पैसे कमवून श्रीमंत होण्यासाठी मजुर तरुणाने चक्क नकली नोटा बनविण्याची शक्कल लढविली, युट्युबरवर व्हिडीओ पाहून नकली नोटा सुध्दा बनविल्या, मात्र ही शक्कल त्याला चांगलीच महागात पडली असून जेलची हवा खाण्याची वेळ आली आहे. नकली नोटा बनविणाऱ्या एका मजुर तरुणाच्या पोलिसांली मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून तब्बल ४६ हजाराच्या नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. देविदास पुंडलिक आढाव (वय-30, रा. कुसुंबा तालुका जि. जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
कुसूंबा गावातील देविदास आढाव हा एमआयडीसीतील व्ही सेक्टर येथे भारतीय चलनाच्या नकली नोटा तयार करून ते बाजारात वापर करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांना मिळाली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, चंद्रकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव, सचिन साळुंखे यांनी बुधवारी एमआयडीसीच्या व्ही सेक्टरमध्ये सापळा रचून संशयित देविदास आढाव याला रंगेहात पकडून अटक केली. त्याच्याजवळ असलेल्या कापडी पिशवी जवळपास ४६ हजाराच्या नकली नोटा आढळून आल्या. त्याने भारतीय चलनातील १००, २०० तसेच ५०० रुपयांच्या हुबेहुब नोटा बनविल्या होत्या, युट्युबवर व्हिडीओ पाहून या नकली नोटा तयार केल्याची कबूली संशयित देवीदास याने दिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट नोटा तयार करुन त्या वापरात आणण्याची टोळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, यात देवीदास याचे काही साथीदार आहेत, का याचाही पोलिसांकडून शोध सुरु आहे, दरम्यान संशयित देवीदास यास पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले, न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड स्वाती निकम यांनी काम पाहिले. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक निलेश गोसावी हे करीत आहेत.
#jalgaonnews#crimenews#fakecurruncy#jalgaonpolice