डंपरची दुचाकीला धडक, चाक पायावरुन गेल्याने विवाहितेचा जागीच मृत्यू, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी
जळगाव (क्राईम टूडे प्रतिनिधी) – आत्याच्या मुलाच्या लग्नाला जाण्यासाठी शेजारी राहणाऱ्या कृषीकेंद्रचालकासोबत दुचाकीवरुन निघालेल्या विवाहितेचा डंपरने दिलेल्या धडकेत डंपर पायावरुन गेल्याने मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पाळधी गावाजवळील हॉटेल गोविंदसमोर महामार्गावर हा अपघात घडला. कविता प्रशांत चौधरी वय ३७ रा. झुरखेडा ता.धरणगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर या अपघातात दुचाकीस्वार विलास देवीदास चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत
झुरखेडा येथील रहिवासी कविता चौधरी यांची आत्या जळगाव शहरातील शिव कॉलनीत राहतात आत्याच्या मुलाच्या हळदीचा सोमवारी कार्यक्रम होता. कविता चौधरी यांचे शेजारी राहत असलेले विलास देवीदास चौधरी यांचे जळगावात कृषीकेंद्र आहे. ते दररोज दुचाकीने जळगावला ये जा करत असतात. त्यामुळे कविता चौधरी ह्या सोमवारी विलास चौधरी सोबत दुचाकीवरुन जळगावला हळदीच्या कार्यक्रमासाठी निघाल्या. दुचाकीने येत असतांना पाळधीच्या पुढे गोविंद हॉटेलसमोर भरधाव वेगाने मागून येणाऱ्या जी.जे-०३, बी.वाय-६८३१ या क्रमाकांच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार विलास चौधरी व कविता प्रशांत चौधरी हे रस्त्यावर फेकले गेले. यात दोन्ही पायावरुन डंपरचे चाक गेल्याने कविता चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला तर विलास चौधरी यांच्या डोक्याला ,पाय व डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले , त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. कविता चौधरी यांना रुग्णालयात हलविण्यात आले, याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले, शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटना कळताच पाडळसरे ,झुरखेडा व पाळधी येथील नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळाल्यावर पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच डंपर ताब्यात घेतला. डंपर चालक फरार झाला आहे.
आज कविता चौधरी यांच्या आत्याच्या मुलाचा विवाह सोहळा पडणार होता. मात्र कविता चौधरी यांच्या अपघाती मृत्यूमुळे अगदी साधे पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडणार आहे. मयत कविता चौधरी ह्याचे पाडळसरे येथील माहेर आहे. त्या कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर गुर्जर यांच्या कन्या तर पाडळसरेचे पोलीस पाटील उमाकांत पाटील यांच्या भगिनी आहेत. कविता चौधरी यांच्या पश्चात पती , मुलगा सत्यम वय १४ व मुलगी भूमिका वय १२ असा परिवार आहे.