गावातल्याच तरुणांनी केली होती चोरी…मात्र चोर शेर तर पोलीस सव्वाशेर…
जळगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारातील शेतात असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चक्क घरातील ४९ हजारांचा सात क्विंटल कापूस चोरट्यांनी लांबविल्याची घटना १९ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास समोर आली होती. या टोळीचा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला असून पाच संशयितांना अटक केली आहे. तसेच चोरीस गेलेल्या सात क्विंटल कापसासह चारचाकी वाहन सुध्दा जप्त करण्यात आले आहे.
रांजणगाव शिवारात मनोहर जाधव पाटे वय ६८ यांचे शेती असून या शेतातील असलेल्या घरात त्यांनी सात क्विंटल कापूस ठेवला होता. हा कापूस चोरीस गेल्याचे समोर आले होते. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. आधीच सततच्या नुकसानामुळे हतबल असलेल्या शेतकऱ्याचा हाती असलेला कापूसही चोरीस गेल्याने या घटनेची पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व पोलीस उपअधीक्ष्ज्ञक अभयसिंग देशमुख यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. तसेच संशयितांना अटक करण्याच्या सुचना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस निरिक्षक संजय ठेंगे यांच्या पोलीस उपनिरिक्षक लोकेश पवार, सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे, नंदलाल परदेशी, शंकर जंजाळे, पोलीस नाईक मनोज पाटील, संदीप माने, भूपेश वंजारी याचे पथक नियुक्त करुन सुचना व मार्गदर्शन केले होते. संशयितांचा कुठलाही मागमूस नसतांना गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर पथकाने अजय जयवंत पाटील वय २५, प्रकाश ऊर्फ मुन्ना लक्ष्मण पाटील वय २१, चंद्रकांत ऊर्फ बंटी गोकूळ मोरे वय २५, शालीक अरुण पाटील वय २५ व सुरेश ऊर्फ पप्पू राजेंद्र कोष्ठी वय २६ सर्व रा. रांजणगाव ता. चाळीसगाव या संशयितांना अटक केली होती. चंद्रकांत मोरे यांनी हा चोरलेला कापूस हा आपल्या मालकीचा असल्याचे सांगत चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील व्यापाऱ्याला दिला होता, माल तुमच्याकडे ठेवा, पैसे नंतर घेवून जावू असे सांगितले होते, असेही तपासात समोर आले आहे, त्यानुसार पोलिसांनी चोरीस गेलेला कापूस , गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन जप्त केले आहे. अवघ्या दहा दिवसात आपला चोरीस गेलेला कापूस परत मिळाल्याने पोलिसांच्या कामगिरीवर शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले आहे.
#chalisgaonnews#crimenews#cottonrobbory#chalisgaongraminpolice