नाशिक (क्राईम ट्युडे टीम) – सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास शिर्डीला जात असलेल्या साई भक्ताच्या बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
अंबरनाथ, ठाणे, उल्हासनगर येथून साई भक्त शिर्डी येथे दर्शनाला जात होते. उल्हासनगर येथून १५ बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. मुंबई येथून शिर्डी कडे जाणारी खाजगी आराम बस क्रमांक एम एच ०४ एसके २७५१ व शिर्डी कडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालट्रक क्रमांक एम एच ४८टी १२९५ यांची सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथेर गावच्या जवळ समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. बसमध्ये चाळीस प्रवासी होते. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. बसमधील अनेक प्रवाशी जखमी झाले. यात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यात सहा महिला दोन पुरुष दोन बालकांचा मृत्यू मध्ये समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या २६ प्रवाशांना सिन्नर आणि नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली आहे.
अपघातात मयत व्यक्तींना पाच लाखांची मदत
या अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने गंभीर दखल घेतली आहे. अपघातात मयत व्यक्तींच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर अपघातातील जखमींवर उपचारासाठी नागरिकांना शासनाकडून मदत केली जाणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही या माहिती मिळाल्यावर अपघातातील मयतांच्या नातेवाईकांची तसेच रुग्णालयात जावून जखमींची भेट घेतली. अपघात नेमका कसा झाला याची चौकशी केली जाईल, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली आहे.
#Nashikaccedent#shirdibusaccident#crimenews#accedentnews