- एकाच कुटुंबांतील निघाली दोघांची अंत्ययात्रा
- एकाच दिवशी घटनांनी पाचोरा शहरातील हनुमाननगरवासिय सुन्न
जळगाव (प्रतिनिधी)- पाचोरा शहरातील हनुमान नगर भागातील एका २७ वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली. तरुणाच्या मृत्यूचा त्याच्या काकूला मोठा धक्का बसला. या आक्रोश करत असतांना रात्रीच्या वेळी काकूला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात हलवित असतांना काकूनेही प्राण सोडले. किरण मोरे (वय – २७) असे मयत तरुणाचे तर उषाबाई मन्नु सोनार (वय – ४०) असे तरुणाच्या मयत काकूचे नाव आहे. एकाच दिवशी दोन अंत्ययात्रा निघाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाचोरा शहरातील हनुमान नगर भागातील रहिवाशी दादाभाऊ मोरे व त्यांचे दोन्ही भावांचे कुटुंब एकाच ठिकाणी वास्तव्यास आहे. दि. ११ जानेवारी रोजी दादाभाऊ मोरे हे यांचे काकाच्या उत्तरकार्यासाठी वरखेडी ता. पाचोरा येथे गेले होते. उत्तरकार्य आटोपुन आल्यानंतर त्यांचा लहान मुलगा किरण मोरे हा कामानिमित्त शहरातील दुसर्या भागाकडे जात असतांना पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे लाईन क्रास करत असतांना मुंबई हुन जळगांवच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने किरण सोनार यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे, पोलिस कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून किरण सोनार यांचा मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहे.
*एकाचवेळी निघाली दोघांची अंत्ययात्रा, रहिवासी सुन्न*
किरणच्या मृत्युची बातमी त्याच्या कुटुंबीयांना कळताच सर्वांनी एकच आक्रोश केला. आक्रोश करत असतांना किरणची काकु उषाबाई मन्नु सोनार यांना तिव्र ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी जळगावला हलवित असतांना वाटेतच उषाबाई यांची प्राणज्योत मालवली. एकाच दिवशीच्या या दोन घटनांमुळे हनुमान नगर परिसरातील नागरिक सून्न झाले असून राञभर येथील रहिवासी नागरिक जागीच होते. आज गुरुवारी सकाळी १० वाजता काकु व पुतण्या अशा दोघांची एकाच ट्रॅक्टरवर अंतयाञा काढण्यात आली.
किरण हा घरातील कर्ता मुलगा होता. तो पाचोरा शहरातील तारखेडा रस्त्यावर चहा, नाष्ट्याचे दुकान चालवित होता. त्याने एक दिवसापुर्वीच रिक्षा विकत घेतली होती. त्याच्या पश्चात आजी, आई, वडिल, भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे. तर किरणची काकु उषाबाई ही सुध्दा त्यांच्या घरातील कर्ती महीला होती. त्या शहरातील एका रुग्णालयात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होत्या. पतीचे एका अपघातात पायाचे आॅपरेशनही त्यांनी केले होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे.
#jalgaonnews#crimenews#pachoranews